-->

15 April 2011

माझ्या काही गंभीर कविताकाय रे हे देवा?

देव हि हल्ली माणसांसारखेच वागतात,
लाच घेवूनच बहुतेक भक्तगणांना पावतात.

शिर्डीचा साईबाबा हल्ली सोन्याचा मुकूट घालतो,
नेहमीचा दगड सोडून चांदीच्या सिंहासनावर बसतो.

शनीशिंगणापुरचा महिमा! घरांना नाही दार,
इथे भक्तांच्याच वस्तू व्हायला लागल्या गहाळ.

देवांमध्ये आजकाल चढाओढ सुरु आहे हि कसली,
तुझ्यापेक्षा माझ्याच भक्तगणांची रांग बघ दूरवर पसरली.

मंदिरातले दुरूनही सहज देवदर्शन आजकाल दुर्लभ झालेय,
देवाने का असे स्वत:ला गाभारयातच बंदिस्त केलेय?

देवांना हि लागली वाटते चटक सुखाची,
सोन्या चांदीने अंगभर मढवून घेण्याची.

आता ह्या सगळ्याला देवा तू म्हणशील “मानवाची करणी”
पण ज्याला घडवणारा हि तूच, त्याला तूच दिलीस ना हि बुद्धी?

- संतोषी साळस्कर.

*****************************************************


जगबुडी

कुठे ढगफुटी तर कुठे रस्ता खचलाय,
ओझोनचा ही थर हळूहळू कमी होत चाललाय.

प्लास्टिक, इ-कचऱ्याने जमीन नासवली,
कुठे पुराचे पाणी सर्वत्र थैमान घाली.

उष्णता वाढली आणि हिमनग वितळू लागले,
ज्वालामुखीनेही अशात डोके वर काढले.

सुनामीने सर्वत्र हाहाकार माजवला,
तेलगळतीने सारा समुद्र बरबाद केला.

सिमेंटच्या जंगलाला प्रदुषणाचा विळखा,
उष्यामुळे जंगलात कुठेतरी वणवा पेटला.

खनिज तेलाच्या विहिरींना अचानक लागलेली आग,
निसर्गाने मानवावर काढलेला एक प्रकारचा हा सारा राग.

पाहून हे सारे एकच खंत वाटते,
निसर्गापुढे मानवाची नेहमीच हार असते.

जगबुडी आता आली आहे जवळ,
पृथ्वीबरोबरच मानवाचा विनाश आहे अटळ.

- संतोषी साळस्कर.

*************************************


आत्महत्या

का करत असतील लोक आत्महत्या
काय चाललं असतं त्यावेळी मनात त्यांच्या.

जगाचा वैताग आलेला असतो की
स्वत:च्याच अविरत विचारांचा.

एकटेपणाला कंटाळलेले असतात की
लोकांच्या हजार प्रश्नांना.

संपवून आपले सारेच आयुष्य
कोणावर ते असा सूड उगवतात.

जगणंच त्यांना का इतकं
त्यावेळी असह्य झालेलं असतं.

करून आत्महत्या अखेर त्यांनी
असं काय साध्य केलेलं असतं.

विचार करता करता
अखेर कोडे सुटले,
जगण्यापेक्षा का त्यांना
मरणच आपलेसे वाटले.

विवशता एखाद्याची खरचं
किती भयानक असते,
परिस्थितीपुढे नकळत प्रत्येकाला
शरण व्हायला लावते.

सगळेच प्रश्न जर आत्महत्येमुळे
सुटत असतील एका क्षणात,
काय अर्थ आहे मग तुम्हीच सांगा
असे निरर्थक जिवन जगण्यात?

- संतोषी साळस्कर.

2 comments:

  1. Donihi gambhir kavita khupach chhan aahet.

    ReplyDelete
  2. जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
    नोट : तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा किंवा वेबसाइट वर संपर्क फॉर्म भरा.

    http://kimayagaar.in/

    ReplyDelete