-->

15 March 2010

माझ्या काही रोमांटिक कविता


दूर कुठेतरी

दूर कुठेतरी
शांत समुद्रकिनारी ...
कुशीत तुझ्या मी
अन गुंफलेले हातात हात...
थोडेसं लाटांसोबत अन
थोडेसं एकमेकांसोबत खेळून ...
मावळत्या सूर्याच्या साक्षीने ...
एकमेकांकडे पाहत
सारया जगाला आज विसरून जावू ...
मिठीत एकमेकांच्या ...
चल ना रे सख्या
आज आपण विरघळून जावू ...

- संतोषी साळस्कर.


*******************************


मिलनाची रात

ठरवले नव्हते काही
कसे अचानकच हे घडले
अबोल्याने माझ्या तुला
अजूनच जवळ आणले.

होता तुझा सर्वांगावर स्पर्श
राग माझा वितळू लागला,
बाहुपाशात मग तुझ्याच
स्वत:ला हरवू लागला.

सुरु केलेस तुझे चाळे
मन माझे भटकवलेस,
भिडवून देहाला देह
कौमार्य कायमचे मिटवलेस.

प्रेमाच्या वर्षावात जणू
दोघंही न्हाहून निघालो,
चरणसीमा गाठताच
पुन्हा एकमेकांना बिलगलो.

तू अन मी पण तेव्हाच
कायमचे गळून पडले,
आपण हेच आता खूप
जवळचे वाटू लागले.

- संतोषी साळस्कर.


*****************************


तू-मी जसे सूर्य-चंद्र

तुझा आवडता सुर्य,
माझा आवडता चंद्र,
तू आगीचा तप्त गोळा.
मी शितल दुधाची छाया.

सगळ्यांसाठी तू दिवसभर सूर्यासारखा खपतोस,
रात्री माझ्या कुशीत हळूच अंग टाकून झोपतोस,
माझे हि काम त्या चंद्रासारखेच रात्रभर जागणे,
प्रेमाच्या वर्षावात तुला अखंड न्हाहून टाकणे.

जसा सूर्याचा उसना प्रकाश
चंद्राचे रूप उजळवतो,
तसाच तुझा स्पर्श रे सख्या
माझे सौंदर्य खुलवतो.

एकटाच तळपतो तो सूर्य नभी
तसेच तुझे हि असामान्य तेज,
सोबतीला माझ्या जरी चांदण्या
तुझ्याशिवाय नाही रे अजिबात चैन.

- संतोषी साळस्कर.


*******************************


भास

कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.

बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.

सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.

जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.

नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास.

- संतोषी साळस्कर.


******************************



नदी आणि सागर

एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी.

वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली.

असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले.

शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले.

पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली.

सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.

तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली
अधुराच नदीविनाही सागर.

- संतोषी साळस्कर.


****************************


तू

कोडयात टाकतं खरंतर मला
कधी कधी तुझं वागणं,
कधी प्रेम, कधी अबोला
कधी नूसतचं एकटक पाहणं.

कधी असतोस पावसांच्या सरी
मनाला हळुवार स्पर्शून जाणा-या,
कधी होतोस इंद्रधनुष्य
आयुष्याचे विविध रंग दाखविणारा.

कधी येऊन भुंग्याप्रमाणे
माझे सर्वस्वच लुटतोस,
कधी नाजुक फुलांप्रमाणे
मला अलगद जपतोस.

कधी बनून विशाल व्रुक्ष
मायेची सावली देतोस,
रागावल्यावर जणू काही
तप्त वाळवंटच भासतोस.

खंर सांगु का, तु मला
केव्हा जास्त आवडतोस,
मी काही न बोलताही
मनातील सर्वच जाणतोस.

- संतोषी साळस्कर.


*****************************


भेट

मनातील तुझ्या विचारांना
आवर कसा रे घालु,
तूच सांग अजून किती दिवस
तुला नुसतंच स्वप्नात पाहू.

भेटशील कधीतरी याच आशेवर
अजूनही मी रे जगतेय,
नजर का गर्दीत दरवेळी
तुलाच जिथेतिथे शोधतेय.

ये ना आतातरी समोर
का इतकं सतावतोस,
जाणून बुजूनच ना रे
तू हे सर्व काही करतोस.

म्हणूनच ठरवलंय मी हि
आता माझ्याच मनाशी,
समोर येत नाहीस तोपर्यंत
जा कट्टीच तुझ्याशी.

- संतोषी साळस्कर.


**************************



मी आणि प्रेम

वाटेवरती सहजच एकदा
मला जेव्हा प्रेम दिसला,
नजर चुकवून मी जावू लागली
तर तो वाटच माझी अडवू लागला.

मी म्हणाली काय आहे
वाटेत का असा आडवा येतोस,
पुन्हा नजरेसमोर येवून
का मला असा त्रास देतोस.

तो म्हणाला :
म्हणटलं आता सरळ
तुलाच जावून विचारुया,
माझ्याबद्दलच्या कडवटपणाचं
रहस्यतरी तुझ्याकडून जाणुया.

फक्त नाण्याची एक बाजु बघुन
तू अख्ख नाणं खोटं ठरवतेस,
म्हणूनच आलोय मी तुला न्यायला
माझ्या बाबतीतलं तुझं मत बदलायला.

तुच आंधळेपणाने
कुणाच्याही प्रेमात पडतेस,
दोष मात्र नंतर त्याचा
मलाच देत बसतेस.

का असते तुला खरंच
प्रत्येक गोष्टीत इतकी घाई,
प्रेमात का ग पडतेस तू
नेहमीच इतक्या लवकर बाई.

प्रेमाची कबुली देण्याआधी
नीट पारख त्या व्यक्तीला,
खरंच देईल का तो शेवटपर्यंत साथ
विचार आधी स्वत:च्या मनाला.

आकर्षणालाच खरंतर तू
प्रेमाचं नाव देतेस,
क्षणाक्षणाला मग त्यात
असंख्य चुका करतेस.

आनंदाचीही आहे गं
एक चांगली बाजू मला,
पण दुखं, अंश्रु आणि विरहच
का बरं दिसतात तुला.

मनातून काढुन टाक राणी
आतातरी माझ्यावरचा राग,
चल करु पूर्वीसारखी मैत्री
यापुढे शहाण्यासारखी वाग.

- संतोषी साळस्कर.

*************************************

माहित नाही का?

कोणाला तू आवडत नसलास
तरी मला का खूप आवडतोस?

नयनी तुझीच स्वप्ने,
ओठांवर तुझेच नाव,
मनात तुझेच विचार,
आजकाल हे रे असे का?

प्रेमाची हि नशा असावी कि
ह्याला तुझीच जादू म्हणावी?

ओढ तुझ्या प्रीतीची मला
स्वस्थ बसू देत नाही,
कामात हि आजकाल का
कुठेच लक्ष लागत नाही?

आपली सगळी परकी वाटतात
आणि तूच का आपलासा वाटतोस?

पण तुला कळत नाही
माझ्या हृदयाचे दु:ख,
कारण बघावं तेव्हा तू तर
असतोस आपला रुक्ष.

चल ये ना आणि मला तुझ्या कुशीत घे,
नेहमीच्या त्या आपल्या स्वप्नांच्या नगरीत ने.

- संतोषी साळस्कर.


*****************************************



6 comments:

  1. बापरे!!!!!!!!!!
    कस काय गं सुचत तुला इतकं मस्त लिहायला?
    खरच मास्त्त्तत्त्त्तत्त च लिहितेस.
    छानच कविता आहेत.

    ReplyDelete
  2. वा वा कविता खुप सुंदर आहेतच, पण चित्रकला/चित्र पण अप्रतिम आहेत. keep it up :) :D

    ReplyDelete
  3. अप्रतिम मस्त मस्त अगदीच सुरेख
    अप्रतिम खरंच खुप सुरेख!
    चित्रकला/चित्र ही मस्तच रेखाटलंय!
    अप्रतिम आहेत. कीप इत उप :) :D

    ReplyDelete
  4. tu great ahes.............

    mast lihtes.

    ReplyDelete