-->

07 May 2007

माझ्या काही विरह कविता

(माझी हि कविता युगांधरा, अस्पर्शी, हि वाट एकटीची, काजळवात, मला अशीच राहु द्या, घरकुल या कादंबरीतील नायिकांना समर्पित.)

शापित राजकन्या

हस-या चेह-याआड लपवून
मनातील आपल्या वेदना,
वाट पाहत होती राजपुत्राची
एक शापित राजकन्या.

आयुष्यभर एकटेपणाचा
होता तिला शाप,
कळत नव्हते तिलाच
काय केले होते तिने पाप.

मनापासून केले प्रेम
हाच का झाला गुन्हा,
कधीच येणार नाही का
तो राजकुमार तिचा पुन्हा?

अर्ध्यावरच सोडून गेला
तो प्रेमाचा डाव,
मागे फक्त शिल्लक ठेवले
त्याने आठवणींचे गाव.

त्याच आठवणींच्या जगात
स्वत:ला ती सावरतेय,
बेधूंद होना-या मनाला
वेळोवेळी आवर घालतेय.

मोकळी करून देवून
डोळ्यांतील अश्रुंची लाट,
ठरवले तिच्याही मनाने
एकटीनेच चालायची हि वाट.

- संतोषी साळस्कर.


***********************************************


मुक्त मी

मनावर केलेस वार
हृदय माझे तोडलेस,
तुझ्या विचारात बंदिस्त
श्वास माझे कोंडलेत.

अपमानाचे घोट सतत
किती दिवस प्यायचे,
तोडून सारे पाश आज
मला मुक्त व्हायचेय.

घेवून भरारी उंचच उंच
जग आहे मी जिंकणार,
पसरून पंख चोहिकडे
आकाश कवेत घेणार.

दाखवून देणार तुलाही
माझं काय अस्तित्व आहे,
माझ्याशिवाय तू म्हणजे
फक्त एक शून्यच आहेस.

तेव्हाच बहुतेक तुला
माझं खरं महत्व कळेल,
पण माझ्या आयुष्यातून तुला
मी कायमचं दूर केलं असेन.

- संतोषी साळस्कर.


*************************************

गैरसमज

क्षणभर तुझा हात हाती घेतला
मनाला किती बरे वाटले होते,
जणू साऱ्या जगाशी लढण्याचे
बळच तेव्हा मला मिळाले होते.

तुझ्या डोक्यात असंख्य विचारांचे
काहूर त्यावेळी माजले होते,
मला मात्र तुझ्या डोळ्यात
पूर्णपणे बुडून जावेसे वाटत होते.

तू होतास स्वत:शीच झगडत
सारे मला कसे समजवावे,
मला वाटले निदान आतातरी
माझ्या मनातले भाव तुला कळावे.

मनात सहजच आले
हळूच तुझ्या कुशीत शिरावे,
या हृदयाचे त्या हृदयाला
काही न बोलताच सारे कळावे.

पण पुन्हा माझ्या स्वप्नांनी
माझा घात केला,
जेव्हा सर्व गोष्टींचा तू
अखेर उलगडा केलास.

समजत होती प्रेम
मी इतके दिवस ज्याला,
फक्त निखळ मैत्रीचे नाव
तू दिलेस अखेर त्याला.

दोष तुझाही नव्हताच म्हणा
तू होतास परिस्थितीचा गुलाम,
माझ्याच मनावर योग्यवेळी मी
घालायला हवा होता लगाम.

- संतोषी साळस्कर.


******************************


बदल

तो म्हणतो... बदल...
विचार बदल... आचार बदल...
स्वत:लाच पूर्णपणे बदल...
अरे सगळंच बदलायचं तर माझ्यातली मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल तर
प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच होतेस काय?

नक्की माझ्यावर प्रेम करतोस की त्यात काही व्यवहार शोधतोयस?
एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.
आता हे तुझं तूच ठरव...
तुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल?

संतोषी साळस्कर.


*****************************************************


तूच सांग ना का?

तूच सांग ना का यापुढे तुझ्यावर प्रेम करू,
तू तर माझ्यावर कधी प्रेम केलेसच नाहीस,
माझ्या प्रेमाची तर तुला काही किंमतच नाही.

तूच सांग ना का यापुढे तुझ्या आठवणी जपू,
मी तर कधी तुला आठवलीच नाही,
माझ्या आठवणीतही अश्रुंशिवाय काही दिलेसच नाहीस.

तूच सांग ना का यापुढे तुझी वाट पाहू,
तू तर मला कधी हाक मारलीसच नाहीस,
मी मारलेल्या हाकेलाही कधी मागे वळून पाहिलेसच नाहीस.

तूच सांग ना का?

- संतोषी साळस्कर.


********************************************


मी मेल्यावर ...

मी मेल्यावर एकदा मला पाहून जा
देहावर माझ्या थोडी फुले टाकून जा,
खोटे का असेना दोन अश्रुही ढाळून जा
मेल्यावर तरी एकदा प्रेमाचे सुख देवून जा.

एकतर्फी प्रेम केले तुझ्यावर हा गुन्हा झाला
त्यातच माझा अर्धा अधिक जीव रे गेला,
तुझी वाट पाहण्यातच आयुष्य सारे सरले
आणि मग हळूहळू म्हातारपणाने घेरले.

आता नाही रे काहीच अपेक्षा
फक्त एकदाच शेवटचं तुला पहायचंय,
जिवंतपणी जे सुख मिळालं नाही
ते सारं मेल्यावर अनुभवायचंय.

म्हणूनच सांगतेय रे ऐक ना जरा
मी मेल्यावर ...
एकदा तरी मला पाहून जा ...
आणि प्रेमाचे ते सारे सुख देवून जा.

- संतोषी साळस्कर.


***********************************


हल्ली हे असंच होतं

हल्ली हे असंच होतं
रात्रीची झोप म्हणजे
छताकडे एकटक पाहणं
आणि डोळ्यातून अश्रुंच वाहणं.

स्वप्नातसुद्धा आजकाल
का कुणी येत नाही,
एकटेपणा तिथेही काही केल्या
पाठ माझी सोडत नाही.

झोपेची आजकाल खरंच
खूपच भिती वाटते,
पर्याय नसतो दुसरा म्हणून
नुसतेच लोळत राहते.

रात्र जुन्या आठवणीत
अशीच हळूहळू ओसरते,
अवचित लागतो डोळा
आणि नेमकी पहाट होते.

कोणाला काही कळू न देता
मनातले मनातच लपवून,
होते मग दिवसाची सुरुवात
चेहऱ्यावर मुखवटा चढवून.

- संतोषी साळस्कर.


******************************************


सारे काही ...

बोलायचे असते खूप काही
पण शब्दांचा मेळ साधता येत नाही
आणि मनातच राहून जाते सारे काही ...

विसरायचे असते खूप काही
पण विसरता मात्र येत नाही
आणि आठवणच जागवून जाते सारे काही ...

मिळवायचे असते खूप काही
पण नशीब साथ देत नाही
आणि स्वपनच बनून राहते सारे काही ...

- संतोषी साळस्कर

*****************************************


आठवणी

मी करत होती प्रेम
तेव्हा भाव खात होतास,
निघून गेल्यावर मात्र आता
आठवणी जपत बसलास.

तुझ्या एका हाकेवर
मी आली असती धावून,
अखेर मीच थकली रे
तुझी वाट पाहून.

तू तर त्यावेळी माझी
पर्वा ही नाही केलीस,
माझ्या मनाची अवस्थाही
कधीच नाही जाणलीस.

माझ्या जबाबदारीचं ओझं
तुला घ्यायचं नव्हतं,
मी तरी रे काय करु मला
लग्नाचं नातं हवं होतं.

माझ्या आयुष्याचा मार्ग
मीच मग निवडला,
मातापित्यांनी शोधलेला मुलगा
जोडीदार म्हणून स्विकारला.

माझ्यावरचं प्रेम बहुतेक
आता तुला जाणवतंय,
पण खुप उशीर झालाय
हेच तुला मला सांगायचंय.

मी नाही जपणार तुझ्या
कुठल्याच आठवणी भविष्यात,
कारण मी खुश आहे आता
माझ्या नविन आयुष्यात.

- संतोषी साळस्कर.


******************************


व्यथा

मनावर विचारांचा मारा,
अव्यक्त भावनांचा कोंडमारा,
वाहत्या अश्रुंचा सहारा,
मध्येच कधीतरी असेच,
जुन्या आठवणींना उजाळा.

फसवं स्वप्नांचं जग,
बैचेन मनाची तगमग,
अपेक्षांचं भलंमोठं ओझं,
सहनही होत नाही,
सांगताही येत नाही.

भास आणि फक्त भास,
कधी वेदना देतात त्रास,
हसण्यांतही आणि रडण्यांतही,
कुणासाठी नुसतंच झुरणं,
रोजचंच हे असं जगणं.

- संतोषी साळस्कर.


******************************


मित्र आणि प्रियकर

मित्र असेपर्यंत ठीक होता,
प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन
अधिकारच माझ्यावर गाजवतो,
प्रत्येक गोष्टीतही विनाकारण
Explanation आता हा मागतो.

मित्र होता तेव्हा नेहमी
माझ्याआधीच आलेला असायचा,
प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन
कामातील व्यापामुळे दरवेळी
वेळच ह्याच्याजवळ नसायचा.

मित्र होता तेव्हा कसा
स्वत:हूनच फोन करायचा,
प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन
मी केलेला फोनही कधी कधी
रागाने नाही उचलायचा.

मित्र होता तेव्हा कसा
रागाची माझ्या खूप पर्वा करायचा,
प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन
उगीचच माझ्यावर भडकतो
आणि रोजच मला हा रडवतो.

मित्र असेपर्यंत सगळं ठीक होतं,
प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन
ह्याचं नातं अजूनही तसंच आहे सगळ्यांसाठी,
मी मात्र बंदिस्त ह्याच्याच कोषात जगासाठी.

- संतोषी साळस्कर.


******************************


रातराणी

काय उपयोग दोष देऊन त्या भुंग्याना,
चूक तर आपलीही तेवढीच असते ना,
सर्वकाही कळत असूनही जाणुनबुजून
ओरबाडण्याचे स्वातंत्र आपणच त्यांना दिले ना?

आपण फ़क्त मागे आठवनी जपत राहतो,
तो नेहमीप्रमाने दुसरया फ़ुलावर चाल करुन जातो,
सर्वकाही करुनही तो नाम-निराळाच राहतो,
दोष मात्र त्याचा निष्पाप फ़ुलांवर येतो.

पुन्हां मग रातराणीचे ते सुर्यप्रकाशात
आपल्या भुंग्याकडे पाहुन झुरणे,
आणी चंद्रप्रकाशात शेवटी मग पुन्हां
नेहमीप्रमाणे तसेच विना गंध उमलणे.

- संतोषी साळस्कर.


******************************


भावना

प्रेमाचा खेळ आयुष्यात
कधी-कधी नकोसा वाटतो,
सहवास कुणाचा तरीही
आपल्याला हवाच असतो.

निशब्द रात्री जेव्हा
आसवात चिंब भिजतात.
रिकाम्या स्वप्नांत उगीचच
कसलेतरी भास होतात.

आभाळातल्या चंद्र-चांदण्या
एकत्र जेव्हा दिसतात,
ह्रदयात मात्र नको त्या
भावना जागवून जातात.

नयन सदैव कुणाचीतरी
आतुरतेने वाट पाहतात,
कितीही वेदना झाल्यातरी
ते हसत सहन करतात.

मिळालं की गमावलं
मला नाही काही कळत,
कितीही समजावले तरी मन
प्रेमाच्या विरोधात नाही वळत.

- संतोषी साळस्कर.


******************************


दिवा

दिवाळीच्या दिवशी पेटवतात पणती
आणि करतात लक्ष्मीची आरती,
दूर होतो घरातला अंधकार
आणि लक्ष्मी येते आपल्या घरात.

माझ्या मनातही असाच
एक दिवा जळत आहे,
जो वाट पाहत आहे त्या प्रकाशाची
जो करेल दूर अंधार माझ्या जीवनातील.

- संतोषी साळस्कर.


************************************


असं काही झालं की खूप राग येतो...

असं काही झालं की खूप राग येतो,
मला बोलायचे असते खूप काही,
पण त्याच्याजवळ कधी वेळच नसतो,
काहीतरी कारण सांगून का तो उगिच मला टाळतो?

असं काही झालं की खूप राग येतो,
त्याला एकटेपणा जाणवल्यावर मला जवळ करतो,
स्वत:च्या मनाप्रमाणे मग हवंतसं वागवतो,
माझ्या भावनांशी दरवेळी का तो खेळतच राहतो?

असं काही झालं की खूप राग येतो,
हवं तेव्हा तो मला आपलं म्हणतो,
वाटेल तेव्हा एका क्षणात परकं करतो,
असं असेल तर का तो माझ्या आयुष्यांतच पुन्हा येतो?

- संतोषी साळस्कर.


************************************


भटकणारी आत्मा

मी ना कुणाचीही
आता कुणीही राहिली,
सगळीच नाती अखेर
माझी इथली संपली.

शरीर मेलं असलं तरी
आत्मा अजूनही जिवंत आहे,
कोणाच्यातरी प्रतिक्षेत तो
इथून तिथे भटकतो आहे.

लवकर द्या मुक्ती मला
नाहीतर मी पिसाळेन,
भूत बनून तुम्हां सर्वांना
बघा हा मी खूप छळेन.

- संतोषी साळस्कर.


************************************


आठवणींचा पाऊस

एकटेपणाचं दु:खं सतत
किती दिवस सहायचं,
जुन्या आठवणींना अजून
किती दिवस आठवायचं.

मी हि आहे रे इथे बैचेन
तुझ्यासारखीच ह्या पावसात,
पण कधी रे येणार सांग ना
तुझ्याही ते सर्व ध्यानात.

तु हि जरा जाणून घे रे
माझ्या मनातील भावना,
घायाळ ह्रदयावर प्रितीचे औषध
तू लवकर येवून लाव ना.

- संतोषी साळस्कर.


***************************************


मन

कधी कधी मनाची
अशी अवस्था का होते,
विचारच विचार आणि मग
अचानक निराशा येते.

आशेच्या हिंदोळ्यावर झूलताना
मन हे अचानक उन्मळून पडते,
स्वत:ला आवर घालता घालता
परिस्थितीच हाताबाहेर निघून जाते.

आठवणींच्या लाटेवरून फिरूनी
मन हे जेव्हा परतून येते,
डोळ्यांच्या किना-यावर अलगद
अश्रुंचा का पाऊस पाडून जाते.

- संतोषी साळस्कर.

***************************************


प्रेमातील काटे

कोण रे तू
कुठून आलास?
मनावर माझ्या
राज्य करून गेलास.

क्षणभरासाठीच मायेची
सावली बनून आलास,
आयुष्यभरासाठी अश्रुंचा
पाऊस देवून गेलास.

येताना प्रेमाची
फुले होती आणलीस,
जाताना विरहाचे
काटे तेवढे दिलेस.

तेच काटे आता
मला सतत टोचतायत,
शिल्लक राहिलेला प्राण जणू
शेवटची घटका मोजतायत.

- संतोषी साळस्कर.









****************************************



11 comments: