जगात प्रत्येकाला काही ना काही दुःख असतंच तरीही प्रत्येकजण जगत असतोच. सुखाची वाट पाहत आलेल्या दुःखाला पचवत असतो.
-----------
आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की आपण पूर्णपणे मेंटली ब्लॉक होवून जातो. काय करायचं, कसं करायचं, कुठे जायचयं, काय हवंय काही काही कळत नाही. कुणी तरी येवुन यातून आपल्याला बाहेर काढेल या प्रतीक्षेत शून्यात नजर लावून बसलेले आपण...
-----------
कधी कधी स्वतःच्याच मनाला काही गोष्टी समजावणं इतकं कठीण होवून बसतं. लहान मुलांसारखे मन आपल्याकडे हट्ट करून बसतं. दरवेळी हे असं माझ्यासोबतच का? सर्व काही माहिती असूनही आपण परिस्थिती पुढे हताश असतो. या मनाला कसा दिलासा द्यावा, कसं शांत करावं तेच कळत नाही.
-----------
माणसाने या स्वार्थी जगात नेहमी व्यवहारी असावे. इथे भावनिक होवून चालत नाही. आपला फायदा नुकसान आपणच बघायचा असतो. काही जण इतके व्यवहारशून्य असतात की समोरचे त्यांचा फक्त आपल्या फायद्यासाठीच वापर करतायत हे ही अशांना कळत नाही, कि कळत असूनही वळत नाही देव जाणे! अश्या व्यक्ती मनाने चांगल्या असूनही नेहमीच इतरांकडून दुखावल्या जातात.
-----------
काही लोकांच्या बाबतीत खरंतर प्रेमबिम सारं झूठ असतं. सगळा दिखावाच असतो. अखेर ओढ फक्त शरिराचीच असते. मग तो पुरुष असो की स्त्री! त्या ओढीची पूर्तता जर सहजोडीदार नाही करू शकला तर इथे त्यालाच बदलले जाते. यांच्या नजरेत भावनांना काहीच महत्त्व नसते तर एखाद्याच्या दिसण्याला, बोलण्याला, दिखाव्याला जास्त महत्त्व असते. कपडे बदलावे तितक्या सहजी हे जोडीदार बदलतात. जोडीदाराशी प्रतारणा करणं कसं यांना जमतं काय माहीत.
-----------
प्रेमात खऱ्या भावना कधी व्यक्तच करू नयेत नाहीतर घोर निराशा होते. इथे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला गृहीत धरलं जातं...
-----------
ज्या मुलांना आपल्या आई-वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही अशी मुलं नजरेसमोर येताच नकळतपणे आपण स्वतःला नशीबवान समजतो. प्रेमळ आई-बाबा दिल्याबद्दल देवाचे आभारही मानतो.
पण अचानक आयुष्यात कुणीतरी येतं. त्या व्यक्तीच्या प्रेमापुढे आई-वडिलांचे इतक्या वर्षाचे प्रेम ही आपल्याला फिके वाटू लागते. त्यात जर आई-वडिलांचा त्या प्रेमाला विरोध असेल तर इतके दिवस प्रेमळ वाटणारे आई-बाबा अचानक खलनायक वाटू लागतात. फक्त दोन क्षणांच्या प्रेमासाठी आपण जन्मापासून प्रेम करणाऱ्या आईबाबांना ही दूर करायला तयार असतो... हो खरंच!
-----------
- संतोषी