अशी मी, तशी मी
मी आहे अशी, मी आहे तशी
मलाच कळत नाही नक्की मी कशी,
कुणी म्हणतं खूपच साधी, गबाळी,
कुणी म्हणतं भांडखोर भारी.
पण खरं सांगू का...
मी आहे राजकुमारी,
माझ्या स्वप्नातल्या जगाची,
जिथे चालते हुकुमशाही
नेहमीच माझ्या मनाची.
मला आवडतं फुलं-पानांत रमायला,
निसर्गस्थळी वाटेल तेव्हा फिरायला.
छंद माझे चित्रातील रंगाशी खेळणे,
मनातील विचार कवितेतून मांडणे.
नवनवीन शिकण्याची आवड
नृत्य हि मला खूप भावतं,
आवडीचे संगीत हि मग
नकळत ठेका धरायला लावतं.
रातकिडयासारखे रात्रभर जागते
आणि सकाळी उशिरा उठते,
स्वत:च्याच अशा एका वेगळ्या
विश्वात नेहमीच रमते.
मनात जे येतं तेच बोलते
न बाळगता कसली भीड,
खोटं बोलणारयांची मात्र
मला खरंच येते खूप चीड.
अजून काय बरं सांगू?
मी स्वत:बद्दल आता
चांगली कि वाईट ते
तुमचं तुम्हीच ठरवा.
- संतोषी साळस्कर.