-->

09 September 2011

लेडीज गप्पा-टप्पा

राणी : वाह! सगळ्याजणी आल्या पण.

शैला : या लेट लतीफ... तुझी हि नेहमी उशिरा यायची सवय कधी जाणार गं?

राणी : माहित नाही....

अलका : कशी आहेस राणी?

राणी : कशी दिसतेय?

अलका : तुझ्यात अजून काही फरक पडलेलाच नाही. कॉलेजमध्ये जशी होतीस अजून हि तशीच आहेस.

राणी : म्हणजे? चांगली कि वाईट?

शैला : तुला वाईट म्हणायची हिंमत कोणात आहे एवढी! हाहाहाहा....

राणी : वॉट अ जोक... किती बरं वाटतंय ना... किती दिवसानंतर आज आपण सगळ्याजणी एकत्र भेटतोय.

रितू : हो ना. गेल्यावर्षी दिपूच्या लग्नात भेटलो होतो तेव्हा... त्या नंतर आज सगळ्याजणी एकत्र भेटतोय.

दिपाली : हो! आज किती मोकळं मोकळं आणि बरं वाटतंय.

शैला : का गं? रोज काय पिंजऱ्यात बंदिस्त असतेस कि काय? हाहाहाहा...

दिपाली : हो नाही तर काय... तसं बघायला गेलं तर पिंजराच आहे माझ्यासाठी ते घर म्हणजे. मनासारखं काही करता येत नाही, वागता येत नाही, कुठे जाता येत नाही. येता जाता सगळे नुसते हुकुमच सोडत असतात तिथे... वर सासुबाईनचे टोमणे...

शैला : करा करा अजून लग्न करा... हाहाहा....

दिपाली : तुझं बर आहे गं आझाद पंछी. आमचं मेलं... जावू देत...

रितू : अगं मग तुम्ही दोघं वेगळे का रहात नाही?

दिपाली : वेगळं रहायचं म्हणजे स्वत:चं घर हवं ना. मुंबईसारख्या शहरात आजकाल परवडतं का घर घेणं? आधिच यांचा पगार तुटपुंजा, त्यात लग्नात भरमसाठ कर्ज काढले होते ह्यांनी, त्यामुळे पुन्हा कर्ज काढून काही करणं आम्हां दोघांनाही पटत नाही. उगाच अजूनच कर्जाचा डोंगर नको वाढायला. म्हणून सध्या मुलांचा विचार पण नाही करू शकत आम्ही आणि वर सासुबाईंचे सतत टोमणे, एक वर्ष झाले आता तुमच्या लग्नाला, नातवाचे तोंड कधी दाखवता आहात...

राणी : मग आज बरं पाठवलं गं तुला...

दिपाली : घरात कोणाला माहित नाही आहे मी इथे येणार आहे ते. ह्यांनी त्यांच्या एका मित्राकडे चाललोय असे सांगितले. घरातून निघताना ह्यांच्या सोबतच निघाली. मला स्टेशनपर्यंत सोडलं आणि ते दुसरीकडे गेलेत काही कामानिमित्त. न्यायला येतील थोडयावेळाने.

अलका : अगं मग घेवून यायचं होतंस ना इथे. ओळख तरी करून द्यायची होतीस आमच्याशी. तुमच्या लग्नात काही नीट ओळख करून घेता आली नाही घाईगर्दीमुळे.

दिपाली : मी सांगितलं पण हे म्हणाले पुन्हा कधी तरी येतो. खरं तर जरा लाजतातच ते.

शैला : का गं बाई? आम्ही काय लाईन नाही मारणार आहोत त्यांच्यावर? हाहाहा....

राणी : ये गप्प गं. बरा दरवेळी हिला मध्येच जोक सुचत असतो.

अलका : तुम्हां सगळ्याजणींना कल्पनाची वाईट बातमी कळली का?

शैला : कोणती गं?

अलका : अगं तिने म्हणजे आत्महत्या केली विष पिवून.

शैला : बापरे! काय सांगतेयस काय?

राणी : पण का?

अलका : प्रेमभंग दुसरं काय...

शैला : अरे मग आत्महत्या कशाला करायची? जगात पुरुषांची काही कमी आहे का? दुसरा कोणी चांगला भेटला नसता का? नको त्या माणसांसाठी जीव देतात उगीच... त्याला काही फरक पडणार आहे का हिच्या जाण्याने? उलट तो आता दुसरीला फसवायला मोकळा... निदान विष पिताना हिने स्वत:च्या आई वडिलांचा तरी थोडा विचार करायचा होता... एवढी वर्षे त्यांनी जीव लावून वाढवली ती काय अशी परक्या मुलासाठी जीव देण्यासाठी का?

अलका : तरी मी तिला किती वेळा समजावलं होतं. तो चांगला मुलगा नाही. तो फक्त तुझ्या भावनांशी आणि तुझ्या आयुष्याशी खेळ खेळतोय. पण हि बावळट ऐकेल तर ना.. दिवस गेले होते म्हणे तिला, त्याने जबाबदारी टाळली. घरच्यांना कोणत्या तोंडाने हे सर्व सांगायचे म्हणून स्वत:लाच संपविले बिचारीने...

शैला : अरे रे... पण आत्महत्या करण्यापेक्षा स्वत:च्या हिमंतीवर त्या बाळाला वाढवायचं ना, नाहीतर त्या फ्रौड माणसाला तरी संपवायचे होते. स्वत:ला संपवायची काय गरज होती?

रितू : बोलणं खूप सोपं असतं गं, पण करणं तेवढंच कठीण...

... क्षणभर शांतता...

दिपाली : सुटली बिचारी एकदाची...

राणी : काय?

दिपाली : काही नाही गं...

अलका : अगं मग तू अशी का म्हणालीस? तुला नक्की काय म्हणायचे होते?

दिपाली : काही नाही गं. जेव्हा प्रॉब्लेम्स असह्य होतात तेव्हा अपमानित जीवन जगण्यापेक्षा स्वत:ला संपवलेलंच बरं. मला पण खूपदा वाटतं की आता सहन होत नाही. स्वत:ची कायमची सुटका करून घेवूया सगळ्यातून, पण हिंमतच होत नाही गं. बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण नाही जमलं. ह्यांचा चेहरा समोर आला की सगळं विसरून जाते मी. उगीच ह्यांच्या मागे पोलिसांचा व्याप नको माझ्या जाण्यामुळे.

राणी : बापरे! तू हे काय बोलतेयस दिपू?

दिपाली : मग काय करू... आत्महत्या करायला पण हिंमत लागते गं आणि माझ्याजवळ ती नाही.

शैला : वेडया सारखं काही तरी बडबडू नकोस यार...

दिपाली : तुमचं बरं आहे गं. लग्नाआधी आईच्या जिवावर मजा तरी करता येते. लग्नानंतर तर काही हौस मौज करायला वेळच भेटत नाही. सुरुवातीचे एक वर्ष मजेत गेले. आता सासरचे सगळे आपले रंग दाखवायला लागलेत. दिवसभर ऑफिसमधून दमून येवून परत संध्याकाळी घरचे सर्व करा. पुरुषांचं बंर आहे आयतं ताट समोर मिळतं. इथे आम्हांला साधं जेवण जरी बनवायला थोडा उशिर झाला तरी सगळ्यांचे टोमणे सुरु होतात. प्रचंड कोंडमारा होतो गं अश्यावेळी मनाचा. जणू काही आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखेच वाटतेय लग्न करून.

शैला : कोणी सांगितलं होतं इतक्या लवकर लग्न करायला?

दिपाली : मला तरी कुठे घाई होती... माझ्या घरच्यांना मी सांभाळायला जड झाली होती बहुतेक...

शैला : हे बरे आहे ना मुलगी मोठी होईपर्यंत तिला अगदी फुलासारखं जपायचं आणि मग परकं धन म्हणून दुसऱ्याच्या हवाली करायचं. मग भले तिची इच्छा असो अथवा नसो... तिथे मुलगी सुखात राहो न राहो.... कन्यादान करून आई बाबा आपले कर्तव्य पार पाडून मोकळे होतात.

अलका : माझा नवरा नाही हा बाई असा. मला सगळी मदत करतो तो. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही हाफ हाफ शेअर करतो.

दिपाली : लकी गर्ल! तसे हे पण सुरुवातीला मदत करत होते गं... पण घरचे सर्व ह्यांना बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणायला लागल्यापासून मदतीला येत नाहीत हल्ली...

शैला : हाहाहा... काय पण ... पुरुषी अहंकार डिवचला गेला ना.

दिपाली : असेल बहुतेक पण कधी कधी ह्यांची खुपच दया येते गं मला. घरातले आणि माझ्यामध्ये हे बिचारे उगीचच बळीचा बकरा बनतात. ह्यांची पण घुसमट होते अश्यावेळी नक्की कोणाची बाजु घेवून बोलावे ह्याविचाराने. तिथून घरचे ह्यांना बोलतात आणि माझा राग कधी अनावर झाला की माझे हि ऐकून घ्यावे लागते.

अलका : घरातल्यांचा राग कधीही नवऱ्यावर काढू नकोस दिपू. नवरा-बायकोनेच एकमेकांना समजून घ्यायचे असते.

दिपाली : हो गं पटतंय मला ते. ह्यांची साथ आहे म्हणून त्या घरात राहणे मला थोडे तरी सुसह्य होते.

शैला : तुम्ही लग्न झालेल्या बायका तुमचे सासरचे प्रॉब्लेम्स जरावेळ बाजूला ठेवता का? आपण ते डिस्कस करण्यासाठी नाही भेटलो आज.

अलका, दिपाली : तुझं लग्न झालं की बघतो मग आम्ही तू कसल्या गप्पा मारतेस ते.

शैला : अय्या दोघी रागावल्या ... हाहाहा...

अलका : मग तुझ्या लग्नाचा बार कधी उडवतेयस रितू?

रितू : माहित नाही...

राणी : म्हणजे?

रितू : काही नाही गं माझं जावू दयात. तुमचं सांगा राणी तू आणि शैला तू ही, कधी लग्न करताय तुम्ही दोघी...

शैला : आधी तुझा नंबर ना... मग आम्ही पण लावतो. तसा लग्न संस्थेवर माझा अजिबात विश्वास नाही. मला लिव इन रिलेशनशिप मध्ये रहायला जास्त आवडेल.

दिपाली : काय???

शैला : इतक्या जोरात ओरडायला काय झालं?

अलका : अगं मग तू हे काय बोलतेयस? तशी तू मॉडन विचारांची आहेस हे आम्हांला माहित आहे पण इतकी?

शैला : हो.. कारण मला नाही वाटत लग्नानंतर माझं एखाद्याशी पटेल वैगरे. सो एखाद्याची लाईफ बरबाद कशाला करा... लिव इन मध्ये जर एकमेकांना वाटले की हा माझा लाईफ पार्टनर बनण्यायोग्य आहे तरच लग्नाचा विचार करु.

रितू : पण जर समजा तुला तो लाईफ पार्टनर म्हणून आवडू लागला आणि त्याला त्यावेळी तसे वाटले नाही तर?

शैला : तर काय तो त्याची लाईफ जगेल आणि मी माझी.

राणी : आणि भावनिक गुंतागुंतीच काय?

शैला : तुम्ही सगळ्याजणी मला नीट ओळखता ना. माझ्या बाबतीत ते शक्य तरी आहे का?

अलका : हिला समजावणं खरंच खूप कठीण आहे... जावू देत... राणी तू कधी नंबर लावतेयस मग?

राणी : मला तर लग्नाची घाई आहे गं.. पण काय करू यार मनासारखा कोणी मिळतच नाही.. मला आवडलेल्यांना मी आवडली नाही आणि ज्यांना मी आवडली ते मला आवडले नाही. आज काल तर बाबा पण सारखे मागे लागलेयत लग्नासाठी. स्वत: तरी लवकर शोध नाही तर आम्ही आणलेल्या स्थळांपैकी कुणीतरी पसंत कर. पण मला अरेंज मँरेज नाही करायचेय यार. एकतर त्यात साडी नेसून चार-चौघांत मी किती सोजव्वळ (अॅक्चुअली मी जे नाही) ते दाखवायचा प्रयत्न करा.. एका भेटीत तर स्वभाव वैगरे पण नीट कळत नाही. खरे रूप तर लग्नानंतरच कळेल ना एकमेकांचे.

शैला : हो एकदम बरोबर...

अलका : काय एकदम बरोबर.. सगळा नशिबाचा खेळ असतो हा. तुम्हां दोघींना माझ्या शाळेतल्या एका वर्गमैत्रीणीची स्टोरी सांगते. त्यावरून तुम्ही दोघीच ठरवा अरेंज आणि लव मॅरेज मधिल काय चांगलं आणि काय वाईट ते. रेखा माझी वर्गमैत्रिण. दिसायला खूप सुंदर, बुद्धिमान होती. शाळेत दहावीत असताना एका मुलाच्या प्रेमात पडली घरून विरोध होता म्हणून दोघांनी पळून जावून लग्न केलं. अशात शिक्षण सुटले. पाच वर्षे दोघांनी सुखाने संसार केला. अचानक तिला पॅरालीसीसचा अटॅक आला. तिची शरीराची एक बाजु पुर्ण लुळी पडली. नीट बोलताही येत नव्हते तिला. थोडे दिवस नवऱ्याने नीट काळजी घेतली तिची पण नंतर त्याला शरीरसुख मिळत नव्हते म्हणून त्याने दुसऱ्या बाईला जवळ केले. कधी कधी हिच्या समोरच तो त्या परस्त्रीशी संग करी. अश्यावेळी हिच्या मनाची काय अवस्था होत असेल तुम्हीच सांगा? ज्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं, आयुष्याचा जोडीदार समजून त्याच्यासाठी स्वत:च्या आई-बाबांना दूर केलं त्याने फक्त आपली बायको आपल्याला शरीरसुख देवू शकत नाही म्हणून दुसऱ्या बाईला जवळ केलं. काय बघितलं होतं मग नक्की हिने त्याच्या प्रेमात पडताना? त्याचे तर फक्त तिच्या शरीरावरच प्रेम होते ना. लव मॅरेज मध्ये जर स्वभाव आधिच कळतो तर मग हिची फसवणूक कशी झाली. आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेणारा असा अचानक बदलला का? फक्त शरीरसुखासाठी? तू म्हणतेस तुला अरेंज मॅरेज करायचं नाही पण आयुष्यभर जोडीदाराची शाश्वती कशातच नाही, ना अरेंज मॅरेज मध्ये ना लव मॅरेज मध्ये. आपलं दैव आधिच लिहून ठेवलेलं आहे. आपल्या हातात काहीच नसतं. आपण फक्त भगवंताच्या हातातल्या कठपुतळ्या आहोत.

शैला : म्हणूनच माझा लग्न संस्थेवर अजिबात विश्वास नाही. कारण स्त्री पुरुष एकमेकांजवळ फक्त एकाच गोष्टीसाठी येतात ते म्हणजे शरीरसुख.

अलका : सगळेच काही असा विचार करत नाही हा. काही स्त्री-पुरूष शरीरसुखापेक्षा जोडीदाराच्या विचारांना जास्त महत्व देतात.

शैला : डोन्ट नो!

राणी : अगं पण नुसतंच एखाद्याला बघून कसं ठरवायचं हाच आपल्या आयुष्याचा जोडीदार. I really hate it.

अलका : अगं मग बाबांना सांग ना की मला थोडा वेळ हवा निर्णय घेण्याआधी. हवं तर तुम्ही दोघं बाहेर भेटू शकता एकमेकांना.

राणी : तुला माझे आई-बाबा माहित आहेत ना यार. आधी साखरपुडा तरी करा मग कुठे फिरायचेय तिथे फिरा आणि मला जर साखरपुड्यानंतर त्याच्या स्वभाव नाही आवडला तर? घरचे कुठल्याही परिस्थितीत लग्न मोडू देणार नाहीत. मग इमोशनल ब्लॅकमेकिंग घर की ईज्जत का सवाल है.. इ. इ. पकाऊ...

दिपाली : कठीण आहे बाई तुझे एकंदरीत...

शैला : डोंट वरी राणी मी आहे तुला कंपनी दयायला... चिअर्स फॉर अवर सिंगल्स. हाहाहाहा...

राणी : थँक्स डिअर... चला कोणी तरी आहे माझ्यासोबत नाहीतर मला वाटलं होतं ‘हि वाट एकटीची’...

शैला : मग रितू आता तरी सांग तू कधी नंबर लावतेयस?

रितू : माहित नाही, पुन्हा पुन्हा तेच तेच विचारू नका...

अलका : बापरे अजून किती वर्ष तुम्ही दोघं थांबणार आहात? आता चार वर्षे तरी झाली असतील ना तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करताय?

रितू : सोड ते सगळं...

राणी : म्हणजे? नक्की झालं तरी काय?

रितू : काही नाही गं..

अलका : अग बोल काही तरी, काय झालं?

रितू : काही नाही गं.. त्याचं लग्न झालं.

अलका : काय?

राणी : कधी?

शैला : आणि तू होवू दिलंस?

रितू : हो. मी काहीच करू शकली नाही... असं काही करण्याआधी मला साधं सांगणं हि त्याला जरुरी वाटलं नाही. डायरेक्ट आला आणि बोलला की माझं लग्न ठरलंय, एक आठवड्यानंतर साखरपुडा आहे आणि मग पुढच्या एका महिन्यात लग्न, घरच्यांनी खूप फोर्स केलं गं, बाबांच्या हट्टापुढे माझे काहीच चालले नाही, त्यांनी आत्महत्येची धमकी दिली, तुझ्याबद्दल हि काहीच सांगता आले नाही इत्यादी इत्यादी. I am really sorry...

शैला : बापरे! म्हणजे चार वर्षे तुमच्यात जे होते ते काय होते? तुझा विश्वास होता ना त्याच्यावर की तो तुझ्याबरोबरच लग्न करणार म्हणून, मग असे केलेच कसे त्याने.

रितू : माहित नाही. मीच अजून त्या धक्क्यातून सावरली नाही. ह्याच महिन्यात त्याचे लग्न हि झाले. मी विसरायचा खूप प्रयत्न करतेय त्याला पण नाही जमत. काय करू आता तुम्हीच सांगा.

राणी : जाऊ देत रितू, त्याच्यापेक्षा नक्कीच एखादा चांगला मुलगा तुझ्या नशिबात असेल म्हणूनच ह्याला देवाने तुझ्यापासून दूर केले. देवावर विश्वास ठेव यार. तो जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो.

दिपाली : हो का, मग तु का नाही तुझ्या बाबांनी आणलेल्या स्थळांपैकी एकाला पसंत करत? देव आहे ना लग्नानंतर तुझ्या पुढील आयुष्यातील चांगलं वाईट बघायला.

राणी : तु लग्न करून खूप खुष आहेस ना! मग बस झाले आणि सध्या माझं जाऊ देत, तू हिला काय ते समजव.

दिपाली : सॉरी... रितू आता जास्त विचार करत बसू नको. एखादा चांगला मुलगा नक्कीच तुझ्या आयुष्यात लवकरच येईल.

रितू : पण मला तोच हवाय गं. ह्या चार वर्षात जरी आमचे लग्न झाले नसले तरी त्याला मी नवऱ्यासारखेच मानत होती. तो हि माझे सगळे हट्ट पुरवत होता. माझ्यावर खूप प्रेम करत होता पण त्याची फॅमिली मध्ये आली.... स्वत:च्या फॅमिलीसाठी त्याने मला सोडलं. एकदा पण माझा विचार केला नाही की माझे काय होईल, मी कशी जगेन त्याच्याशिवाय.

राणी : तू पण ना यार, सोड त्याचा नाद आता तरी..... त्याचे जर तुझ्यावर खरंच इतके प्रेम असते तर घरातल्यांशी भांडून का होईना पण त्याने तुझ्याशीच लग्न केले असते.

रितू : तो तसा नाही गं. मी त्याला चांगली ओळखते. माझ्यावर खूप प्रेम करतो तो. पण त्याच्या बाबांपुढे त्याचेच काय पण घरातल्या इतर हि कोणाचे काहीच चालत नाही.

शैला : अजूनही तुला त्याचाच पुळका आहे का इतके सगळेकाही होवूनही?

रितू : हो, कारण अजूनही मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याच्याशिवाय मला आयुष्यात दुसऱ्या कोणाचा विचार हि करवत नाही. कारण नवरा म्हणून मी त्याच्याबरोबर आयुष्यभराची सगळी स्वप्ने रंगवली होती. पण आता ती सगळी स्वप्ने तुटली. मला समजत नाही आहे मी नक्की काय करू. कधी कधी आत्महत्येचा विचार डोक्यात येतो पण माझ्यातही तेवढी हिंमत नाही म्हणून देवाजवळ मरण मागतेय कधीची, पण तो हि ते देत नाही....

राणी : गप्प बस, दिपू सारखं आता तू हि भलतं सलतं काही बोलू नकोस.

रितू : मग काय करू मी?

शैला : त्याला विसरण्याचा प्रयत्न कर. तो आता कुणा दुसरीचा झाला आहे.

रितू : बोलणं खूप सोपं आहे गं पण करणं तितकंच कठीण..

अलका : जाऊ द्या तो विषय. तिला सगळं काही विसरायला थोडा वेळ लागेल. आपण पुन्हा सगळं काही आठवण नको करून देवुया तिला.

राणी : हम्म!

दिपाली : हे चला मला निघायला हवं. आमच्या ह्यांचा फोन आलाय. स्टेशनवर वाट बघतायत माझी.

अलका : हो चला मी हि निघते. सात वाजत आले. मला घरी जावून जेवण हि बनवायचं आहे.

दिपाली : हो मलाही.

राणी : चला सगळ्याजणीच निघूया मग. पण पुन्हा कधी भेटायचं आपण सगळ्याजणी?

- संतोषी साळस्कर.